Posts

Showing posts from April, 2024

Phaar Luvkar Mothe Zaalo

 दिवसभर खेळून  तुझ्यासोबत हितगुज करून  घरी परतणे मागे कधीचे विसरलो  सखे आपण फार लवकर मोठ्या झालो  आगीनगाडी वा मोटारगाडी  दूर जाताना भीती कशाची  आईच्या मांडीवर निर्धास्त झोपून  प्रवास करणे मागे ठेऊन आलो  सखे आपण फार लवकर मोठ्या झालो  देवळामधल्या आरत्या, गाणी  कीर्तनकार बुवांची कहाणी  हातावरचा प्रसाद फस्त करणे  भोळ्या गप्पा, बालिश भक्ती  देवळामध्येच विसरून आलो  सखे आपण फार लवकर मोठ्या झालो  खोटे, लटके रुसवे फुगवे  छोट्या छोट्या गमती जमती  साध्या पण प्रेमळ भेटवस्तू  छोट्या छोट्या गोष्टींमधला  मोठा आनंद हरवून आलो  सखे आपण फार लवकर मोठ्या झालो  सरल्या मागे घटना जरी  माझी एक मी तिथेच राहाते  विसरलेल्या बालपणाला  आठवण काढून दुरून पहाते  एक तुकडा माझ्या मधला  शेवटी ह्याचाच बनला आहे  मागे सरता सरत नाही तो  सखे जरी आज आपण मोठ्या झालो